जनहित शेतकरी संघटना आक्रमक; कांद्याचे लिलाव बंद पाडण्यासाठी आंदोलन
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णया विरोधात राज्यभर आंदोलने केली जात आहेत. तर केंद्राच्या कांदा खरेदी अश्वासनानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेत. मात्र त्याविरोधात आज देखील आंदोलन सुरू आहेत.
सोलापूर : : 23 ऑगस्ट 2023 | राज्यभर गेल्या दोन एक दिवसापासून कांद्यावरून आंदोलनाचा भडका उडाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात आंदोलने केली जात आहेत. तर केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क वाढीविरोधात ही आंदोलने सुरू आहेत. याचदरम्यान काल केंद्र सरकारकडून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला. यामुळे आता पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेत. मात्र सोलापूरात याविरोधात आता जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेने आंदोलन करत कांद्याचे लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर लिलाव सुरळीत सुरु झाले आहेत. तर समितीत कांद्याची आवक घटली असून दर कांद्याच्या भावात थोडी वाढ झाली आहे. मध्यम दर्जाच्या कांद्याला 1800 ते 2300 रुपये दरम्यान भाव तर उच्च प्रतीच्या कांद्याला 2500 ते 2900 रुपये भाव मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 100 गाडी कांद्याची आवक झाली आहे.