जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,’ म्हणाले फडणवीस साहेब त्यांना जरा नीट समजवा..
मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांचा शांतता मोर्चा मराठवाड्यात भर पावसात सुरु आहे. अनेक ठिकाणी जरांगे यांच्या जेसीबीतून फुले आणि गुलाल उधळत स्वागत होत आहे.
मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात शांतता रॅली सुरु केली आहे. या रॅलीने आज नांदेडमध्ये प्रवेश केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मराठ्यांची लोकसंख्या 50 ते 55 टक्के आहे. मराठे कोणाचेही उपकार ठेवत नाहीत. तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, परंतू जर दगाफटका केला तर 288 पण पाडायला कमी करणार नाहीत असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तुमच्या त्या चंद्रकांत दादा पाटलांना आधी अध्यादेश वाचायला सांगा. ते म्हणतात अध्यादेशाची 2017 ला अमलबजावणी त्यांनी केलेली आहे. तुम्ही त्याला आमच्यावर सोडताय, तुम्ही आमच्या अंगावर कोणा कोणाला सोडताय, छगन भुजबळ, गिरीश महाजन साहेब … कोणाला पाठवताय हे आम्हाला कळत नाही असं तुम्हाला वाटतं का ? नातेवाईकाची 2017 ला अंमलबजावणी झालेली आहे. नातेवाईकांचा अध्यादेश वेगळा आणि सगेसोयऱ्यांचा वेगळा आहे. त्यांना काही माहिती नसते असे बोलताना चंद्रकांत पाटील यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कलही जरांगे पाटील यांनी केली.