बंडखोरांना घाम फोडणारी बातमी! नाशिक, बीड आणि मराठवाड्यानंतर शरद पवार यांच्या येथेही होणार सभा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता बंडखोरांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. नाशिकनंतर पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांची आज बीड येथे सभा आहे. यानंतर आता आणखीन तीन सभा या होणार असून त्याची ठिकाणी ठरली आहेत.
औरंगाबाद : 17 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपला विरोध तिव्र केला आहे. राष्ट्रवादीच्या फूटीनंतर अजित पवार गटात गेलेल्या नेत्यांच्या मतदार संघात शरद पवार जाणार आहेत. याच्याआधी शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या मतदार संघात जाऊन जंगी सभा घेतली होती. त्यानंतर ते आता मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते आज बीडमध्ये सभा घेत आहेत. तर या सभेत ते मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगाबादमध्ये शरद पवार यांचा पुढचा प्लॅन सांगितला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या आणखीन तीन सभा होणार असल्याचे सांगितलं आहे. तर या सभा मंचर, महाड आणि कोल्हापूरला होणार आहेत. त्यामुळे मंचर, महाड आणि कोल्हापूरमध्ये ज्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केला त्यांच्यासाठी आता आव्हान उभ असणार आहे.