लोकसभेसाठी मविआचा 16-16 फॉर्म्यला? आव्हाड म्हणतात…
लोकसभेसाठी समसमान जागा लढवण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्येक पक्षाला 16 जागा देण्याबाबत काँग्रेस आग्रही असल्याचेही समोर आले आहे.
मुंबई: लोकसभेसाठी समसमान जागा लढवण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्येक पक्षाला 16 जागा देण्याबाबत काँग्रेस आग्रही असल्याचेही समोर आले आहे. जागावाटप समान झाल्यास एकत्र असल्याचा संदेश जाईल, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडली. तसेच प्राथमिक फॉर्म्युलासह 1-2 जागांचा कोटा कमी करण्याबाबतही चर्चा झाली असल्याचेही सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांना जागावाटपासंबंधित विचारलं असता त्यांनी ‘मला काही माहित नाही, बैठकीत मी मुका-बहिरा होतो’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ही जहरी टीका केली आहे. ‘रवींद्र चव्हाण यांची तक्रार रास्त आहे.डोक्यावर टाके पडून पण गुन्हा दखल व्हायला चार दिवस लागतात.माझ्या कार्यकर्त्यांवर एक गुन्हा दखल असताना तडिपार करतात. कर्नाटकातील निकाल सुडाच्या राजकारण पार्श्वभूमीवर मारलेली लाथ आहे. लोकांनी मतपेटीतून राग व्यक्त केला. इतकं होऊन सुधारले नाही तर महाराष्ट्रात अजून वाईट अवस्था होईल.ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून दडपशाही सुरु आहे. शिंदे राज्याचे नाही तर ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत’.