‘त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही. ‘मी’ भाग्यवान’, राष्ट्रवादीचा या आमदाराने थेट कारण सांगितलं
शरद पवार येणार म्हणून ज्याने टाळ्या वाजवल्या तोच अजित पवार येणार म्हणूनही टाळ्या वाजवतो. काही जण म्हणाले आमदार भाग्यवान आहेत. मी विचार करत होतो की मी भाग्यवान का आहे?
जुन्नर : 25 सप्टेंबर 2023 | राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाने आमदारांना निलंबन करावे म्हणून निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केलाय. यावरुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी स्वतःला भाग्यवान म्हटलंय. आमदार झाल्यानंतर कोरोना आला, दोन वर्ष गेली. दोन वर्षानंतर अर्धी सत्ता आली. पण, एका दृष्टीकोनातून मी भाग्यवान आहे. एका नेत्याने 40 आमदार निलंबन व्हावे म्हणून निवडणूक आयोगाकडे यादी पाठविली. दुसऱ्या नेत्याने 10 आमदार निलंबित व्हावे म्हणून यादी पाठवली. त्या 50 आमदारांमध्ये माझं नाव नाही. जुन्नर तालुक्यातील जनता मला निलंबित करणार नाही. एक ऑक्टोबरला आदिवासी मेळाव्यासाठी शरद पवार येणार आहेत. या कार्यक्रमाचा मीच आयोजक आहे. 7 ऑक्टोबरला ग्राहक पंचायतीचा ओझर येथे मेळावा असून या कार्यक्रमाला अजित पवार येणार आहेत. त्याचाही मीच आयोजक आहे असे ते म्हणाले.