गद्दारी पचवण्याचा केविलवाणा प्रयत्न, केदार दिघे यांचा धर्मवीर-2 निमित्ताने शिंदेंवर आरोप
धर्मवीर- 1 देखील खोटे नेरेटिव्ह सेट करणारा होता. आणि धर्मवीर-2 देखील खोटा नेरेटिव्ह पसरविणारा असल्याचा आरोप आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी केला आहे.
‘धर्मवीर – 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यात राज ठाकरे यांनी आनंद दिघे यांचा संवाद दाखविला आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना साल 2006 मध्ये सोडली. आणि दिघे यांचा मृत्यू साल 2001 मध्ये झाला होता. या सिनेमात राज ठाकरे यांना दिघे शिवसेना डावलल्याबद्दल विचारताना दाखविलेले आहे. या संदर्भात आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी देखील आपले मत मांडले आहे. दिघे यांच्या मृत्यूवरुन आरोप करणारे 23 वर्षे का गप्प बसले होते. त्यांनी तेव्हाच का नाही आक्षेप घेतला ? हा चित्रपट एकनाथ शिंदे यांची इमेज बिल्डींग करण्यासाठी काढला आहे. यात आनंद दिघे यांचा वापर करुन एकनाथ शिंदे स्वत:ची गद्दारी पचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. याला जनता भुलणार नाही. खरे आनंद दिघे यांचा जीवनपट तयार करायचा असेल तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांना विचारा असेही केदार दिघे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख बाळासाहेब यांनी बनविले होते. त्यांच्या आदेशाविरोधात आता यांना इतक्या वर्षांनी बोलायला सुचतेय. तेव्हा बाळासाहेबांसमोर असे बोलण्याची हिंमत होती का ? हा सर्व खोटे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असल्याचे केदार दिघे यांनी म्हटले आहे.