त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही ,संजय राऊत यांचा निर्धार
आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीचे मोदक खायला जातात. सर न्यायाधीश देखील त्यांना आपल्या घरी मोदक खायला बोलावत असतील तर दुसरे काय होणार ? संपूर्ण न्यायव्यवस्थेचे संघीकरण झालेले असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.
शिवसेना उबाठा गटाचे नेते राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना मानहानीच्या खटल्यात माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवित 15 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.या निकाला विरोधात संजय राऊत यांनी वरच्या कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणाले की मीरा भाईंदर येथील युवक प्रतिष्ठानला शौचालये बांधण्याचे कंत्राट मिळाले होते, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी तेथील विरोधी पक्ष नेते प्रवीण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या संदर्भात पूर्वी शिवसेनेत असलेले आणि आता शिंदे गटात गेलेल्या प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात विधानसभेत चर्चेची मागणी केली. त्यानंतर विधानसभेत यावर प्रश्न विचारले.या संदर्भात पूर्ण चौकशी होऊन सविस्तर अहवाल सादर करावा असे आदेश विधानसभेने दिले. इतके सगळे झाल्यानंतर मी सार्वजनिक क्षेत्रात जनतेच्या पैशाचा अपहार होतोय यासाठी मी हे जनतेपुढे आणले त्यात तर मला दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही ,आम्ही वरच्या कोर्टात दाद मागू असा निर्धार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. मुलुंडचा नागडा पोपट सकाळी उठून बोलतो कोणावरही आरोप करीत सुटतो त्याने मानहानी होत नाही का असाही सवाल राऊत यांनी केला आहे.