छत्रपतींना शिकवण्याचं धाडस करू नका; संयोगिताराजे यांचा नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांना इशारा

| Updated on: Apr 01, 2023 | 9:15 AM

अजूनही खूप प्रवास बाकी आहे...अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे, अशी इन्स्टाग्राम पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिली आहे. पाहा व्हीडिओ...

कोल्हापूर : काळाराम मंदिरात महंतांनी वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केला, अशी पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका, असा इशाराच संयोगिताराजे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांना दिला आहे. “हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे… हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे…, असं संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

संभाजीराजे छत्रपती यांची इन्स्टाग्राम पोस्ट जशीच्या तशी

हे श्रीरामा,

स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे…
हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे,

माणसाने माणसाशी माणसासम वागणे..

आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी?या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते.
त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.

नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.

या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे…

अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे.

Published on: Apr 01, 2023 09:12 AM
वेदोक्त मंत्र प्रकरणावरून आव्हाड संतापले; मग सामान्यांचं काय?
पन्नास खोके घेऊन महिलांना एसटीमध्ये 50% आरक्षण दिलं, पण रिक्षावाल्यांचं काय?; राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा सवाल