Video | ‘एखादा आंदोलक उपमुख्यमंत्र्यांवर आरोप करतो…हे गंभीर…,’ काय म्हणाले विजय वडेट्टीवार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा सलाईनमधून विष देऊन किंवा आपले एन्काऊंटर करुन आपल्याला संपविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. हा गंभीर आरोप असून याची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मुंबई | 25 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनानंतर दोन समाजात विभाजन करण्याचे पाप या सरकारने केले. एकाने मराठ्यांना हाताळायचे एकाने ओबीसींना हाताळायचे असे भांडण लावून दोघांनाही शेवटी झुंजवत ठेवले. नंतर मराठ्यांना 10 टक्के आरक्षणाचा जीआर काढून आम्ही ओबीसींच्या हक्काचं काढलं नाही. मराठ्यांनाही दिल्याशिवाय सोडलं नाही असा दावा करीत सरकारने दोघांनी आम्हाला मतदान करावे असा हा जो डाव होता तो यांच्या अंगाशी आल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. एखादा आंदोलन कर्ता सत्ताधाऱ्यावर तोही उपमुख्यमंत्र्यांवर आरोप करतोय हे गंभीर आहे. याची चौकशी झाली पाहीजे अशीही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ह्या मराठ्यांच्या हक्कांच्या आंदोलनाचा बिमोड करण्यासाठी सरकारने हे केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाच महिने मराठा समाजाला झुलवत ठेवले त्यांना जीआर काढायचा होता तर पाच महिने आधीच का नाही काढला. हे सर्व पाप आता महायुती सरकारला खड्ड्यात घालणार असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.