उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणूकांची घोषणा होणार, आचार संहिता लागू होणार
देशातील लोकसभा निवडणूकांच्या तारखांची उद्या शनिवारी दुपारी 3 वा. निवडणूक आयोग घोषणा करणार आहे. लोकसभा निवडणूका नेमक्या किती टप्प्यात होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असणाऱ्या देशात निवडणूका राबविणे मोठे कौशल्याचे काम असते. संपूर्ण जगाचे भारतीय निवडणूकांकडे लक्ष असते.
मुंबई | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकांच्या तारखांसंदर्भात निवडणूक आयोग घोषणा करणार आहे. उद्या 16 मार्च, शनिवारी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. या निवडणूका नेमक्या किती टप्प्यात होणार आहेत. या संदर्भात उत्सुकता लागून राहीली आहे. लोकसभा निवडणूकांच्या तारखांचा विचार करता अनेक मोठ्या राज्यात विविध टप्प्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या 543 जागांवर निवडणूका होणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलकांनी अनेक मतदार संघात एकाच जागांवर अनेक उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची ईव्हीएम मशिनवर निवडणूक कार्यक्रम घेताना अडचण होणार आहे. त्यामुळे यातून निवडणूक आयोग कसा मार्ग काढते याकडेही लक्ष लागले आहे. निवडणूक तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एक बैठक झाली. या बैठकीत नव्याने नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते.