खारघर हत्याकांडावर श्री. फडणवीस आणि त्यांच्या भाजपची संपूर्ण ‘तीर्थयात्रा’ गप्प का? सामनातून निशाना
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरला जमावाकडून तीन साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे ठाकरेंच्या राज्यात हिंदुत्वाची हत्या झाली अशी सांगत देशात वातावरण तयार केले गेले. त्यावेळी विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस होते. त्यांनीच साधूंच्या हत्येबद्दल सरकारला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली
मुंबई : ‘महाराष्ट्रभूषण‘ पुरस्कार सोहळा, पुलवामा आणि पालघरवरून दैनिक सामनामधून राज्य सरकारसह केंद्र सरकारवर निशाना साधण्यात आला आहे. सामनाच्या रोखठोकमधून सरकारवर निशाणा साधताना माणसांच्या जिवाची सध्या कोणालाही किंमत नाही व पातळी घसरलेल्या राजकारणाने तर सध्या मरण सगळयात स्वस्त केल्याची टीका केली आहे. 14 निरपराध्यांच्या मृत्यूबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सरकारवर का दाखल होऊ नये? हा सरळ प्रश्न केला आहे. तर भारतीय जनता पक्षाचा दुटप्पीपणा कसा तो पहा असे म्हणत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरला जमावाकडून तीन साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे ठाकरेंच्या राज्यात हिंदुत्वाची हत्या झाली अशी सांगत देशात वातावरण तयार केले गेले. त्यावेळी विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस होते. त्यांनीच साधूंच्या हत्येबद्दल सरकारला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. मग आता खारघरमध्ये जे 14 ‘श्री सेवक’ मारले गेले ते झुंडीचेच बळी होते. हे 14 जण हिंदुत्वाच्या कार्यासाठीच खारघरला आले होते व सरकारी बेफिकिरीचे बळी ठरले. मात्र या हत्याकांडावर श्री. फडणवीस आणि त्यांच्या भाजपची संपूर्ण ‘तीर्थयात्रा’ गप्प आहे.