‘महाराष्ट्र पेटवून शेकवायला निघाले…’, शरद पवार यांच्यावर कुणी केला हा हल्लाबोल
सत्ता होती तेव्हा काही केले नाही. आता लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्र पेटवून शेकवायला हे निघाले. मुख्यमंत्री सांगत आहेत सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे तरीही आता जाऊन असे करणे शोभत नाही
हिंगोली : 2 सप्टेंबर 2023 | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार एक फुल दोन हाफ असल्याची टीका केली. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिउत्तर दिले. सरकार एक फुल दोन हाफ आहे की नाही माहीत नाही. पण, सत्तेसाठी सर्वांना फुल समजून फुल बनवण्याचे काम उध्दव ठाकरे यांनी केले. बाळासाहेब ठाकरे यांनी काँगेससोबत ज्या दिवशी जाईल त्यादिवशी दुकान बंद करेल असे सांगितले होते. उध्दव ठाकरे आता त्याच कामात आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला. आरक्षणासाठी शरद पवार साहेबांनी आतापर्यंत काय केलं? आता जाऊन लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. तुमचं सरकार असताना सर्वोच्च न्यायालयात केस हरले. चार वेळा तुम्हीं मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा विषय का काढला नाही असा सवालही त्यांनी केला. सत्ता होती तेव्हा काही केले नाही. आता जाऊन लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्र पेटवून शेकवायला निघाले, अशी टीकाही त्यांनी शरद पवार यांच्यावर केली.