‘मोठ्या सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला?’, आमदार प्रणिती शिंदे यांनी कुणावर केला आरोप?
ठेकेदारी पध्दतीने नोकरी भरती सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे उपेक्षित लोकांचा आरक्षणाचा हक्क हिरावला जाणार आहे. जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात आहे. यामागे मोठा डाव आहे असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.
पंढरपूर : 17 ऑक्टोबर 2023 | लोकसभा निवडणुक लढविण्याबाबत पक्ष जो निर्णय घेईल मला मान्य असेल. मलाच उमेदवारी मिळावी असा माझा आग्रह नाही. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे काम करू असे कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पंढरपूर विधानसभेत आणि सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असे त्या म्हणाल्या. खासगी नोकर भरती करण्यासाठी भाजपने आरक्षण रद्द करण्याचा मोठा डाव आखला आहे. यामुळे उपेक्षित लोकांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने ठेकेदारी पध्दतीने नोकरी भरती सुरू केली आहे. त्यासाठी भाजपने मोठ्या सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला आहे, असा गंभीर आरोपही आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. भाजपाचा हा कुटील डाव मोडून काढण्यासाठी भाजपच्या या धोरणाविरोधात आंदोलन उभे केले आहे असे त्यांनी सांगितले.