मविआ फुटणार, ठाकरे – शिंदे एकत्र येणार? काँग्रेस नेत्याचे नवं भाकीत, राज्यात खळबळ
तसेच त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येतील असा दावा करताना ते दोघेही भाजपला पाठिंबा देतील आणि ही महाविकास आघाडी तुटेल असं म्हटलं आहे. तसेच राज्यातील संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांचं काय होणार याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी फुटणार, त्यांच्यात ऐक्य नाही असे दावे भाजप सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले नेते करत होते. त्यावरून वार पलटवार सुरू होतं. आता मात्र नागपुरातील एका काँग्रेस नेत्यानेच भविष्यात मविआ फुटणार असे भाकीत केल्याने आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ पहायला मिळत आहे. काग्रेसचे निलंबीत नेते डॅा. आशिष देशमुख यांनी हा दावा केला आहे. तसेच त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येतील असा दावा करताना ते दोघेही भाजपला पाठिंबा देतील आणि ही महाविकास आघाडी तुटेल असं म्हटलं आहे. तसेच राज्यातील संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांचं काय होणार याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळ येऊच देणार नाहीत. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अपात्रतेची ही कारवाई सहा वर्षांसाठी असणार आहे. त्यामुळे अनेकजण राजकारणातून बादही होतील, असं देशमुख यांनी म्हटलं. त्यामुळे ठाकरे गटाच्या कुठल्याही आमदार, खासदारांना आपलं राजकीय भवितव्य दावावर लावायचं नाही असेही त्यांनी म्हटलं आहे. तर काही दिवसांपुर्वी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली होती. तर नुकतीच आशिष देशमुख यांची भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी घेतली होती.