Manoj Jarange Patil Hunger Strike | मनोज जरांगे यांची तब्येत कशी आहे ? काय म्हणाले डॉक्टर ?
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी आज सरकारी डॉक्टर उपोषणस्थळी आले होते. काय सांगितले डॉक्टरांनी पाहा
जालना | 11 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारने अलिकडेच काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. हे त्यांचे मराठा आरक्षणासाठीचे तिसरे उपोषण आहे. आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करुन पाच महिने झाले तरी सरकारने गुन्हे मागे घेतलेले नाहीत. तसेच सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत अशांना आरक्षण देण्यासाठी काढलेल्या सगेसोयरेच्या नोटीफिकेशनचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी दोन दिवसात अधिवेशन बोलावून दिलासा द्यावा अशा मागण्यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी रविवारी अंबडचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भीमराव दोडके आंतरवाली सराटीत उपोषण स्थळी तपासण्यासाठी आले होते. परंतू मनोज जरांगे यांनी तपासणी करुन घेण्यास नकार दिला आहे. डॉ.भीमराव दोडके यांनी सांगितले की पोटात अन्न न गेल्याने माणूस अंथरुणावर पडून राहतो. त्याचे वजन कमी होते. शुगर कमी होते. जीवालाही बरेवाईट होऊ शकते अशीही माहीती दोडके यांनी दिली. जरांगे यांनी तपासण्याची परवानगी दिली असती तर प्रकृतीचे निदान नीट करता आले असते असेही त्यांनी सांगितले.