मनोज जरांगेंनी 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता उपोषण कशाला ? छगन भुजबळ यांचा सवाल
मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे नोटीफीकेशनचे कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. परंतू यावर छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. जर उपोषण करायचे होते मग 27 तारखेला गुलाल उधळला होता तो नेमका कशासाठी ? असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. तेव्हा विजयोत्सव साजरा झाला, मग आता उपोषण कशाला ? असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. सरकारच्या सगेसोयरे नोटीफीकेशनचे कायद्या रुपांतर करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे पाच महिने होत आले तरी मागे घेतलेले नसल्याने हे उपोषण असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर जरांगे यांनी भुजबळ म्हातारे झाले आहेत, त्यांना कोण कशाला मारेल अशी टीका केली आहे. भुजबळांना सर्व पोलीस द्या, हवे तर त्यांना पोलिसांचे कपडे घाला अशी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे. यावर विचारले असता भुजबळांनी जरांगे पाटील यांची थेट अक्कलच काढली आहे. उत्तरे देण्यासाठी देखील अक्कल लागते. केवळ काही तरी विरोधी बोलायचे म्हणून ते बोलतात, अर्थात तो त्यांचा दोष नाही. त्यांच्या शिक्षणाचा आणि समजूतीचा असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. जर 27 तारखेला विजय साजरा करीत गुलाल उधळला तर पुन्हा उपोषण कशासाठी ? 15 आणि 16 तारखेला अधिवेशन आहे. त्यात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी कायदा होणार आहे. आमची सुद्धा हीच मागणी आहे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. बॅक डोअर एण्ट्री नको. आधी सुद्धा दोनवेळा कायदा झाला तेव्हा देखील आम्ही पाठींबा दिला आहे. तरीही उपोषण कशा म्हणजे माझ्या उपोषणाने कायदा मंजूर झाला हे दाखवायला का ? असा सवाल भुजबळ यांनी केला.