मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मराठा आंदोलक मनोज जरांगे विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यातच आज महायुतीचे मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने या दोघांमध्ये नेमकी काय? काय चर्चा झाली याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निव़डणूकांमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मनोज जरांगे यांनी आपल्या सहकाऱ्यांना अर्ज भरण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे मंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. या भेटी बाबत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी ही भेट राजकीय नव्हती, कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगरात आपले काही असहकारी अर्ज भरत आहेत. त्यांना एबी फॉर्म देण्यासाठी आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. मनोज जरांगे यांना लोकशाहीत उमेदवार उभे करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांच्याशी सहज गप्पा मारण्यासाठी आल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.