‘छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रीपद नकोच’; बच्चू कडू यांनी मंत्रीपदाला स्पष्ट नकार का दिला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डिनर डिप्लोमसीची जोरदार चर्चा रंगली असतानाच, 'प्रहार’चे आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया देऊन अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
ठाणे : 17 ऑगस्ट 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डिनर डिप्लोमसीची चर्चा रंगली आहे. त्यांच्याकडून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटातील आमदारांसह कॅबिनेट मंत्र्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आलं आहे. याचदरम्यान मंत्रीपदावरून ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू यांनी सतत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता त्यांनी यातून वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. यावरून कडू यांनी, हे निमंत्रण फक्त कॅबिनेट मंत्र्यांनाच आहे. तर मी काही कॅबिनेट मंत्री नाही. त्यामुळे कदाचित बोलवलं नसेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. याचदरम्यान त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपदावरून डिवचले असता, त्यांनी त्यासाठी थेट नकार दिला आहे. त्यामुळे कडू हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर त्यांच्या नाराजीबाबत विचारले असता असे काही नाही. तर मुख्यमंत्र्यांचा मला कालच फोन आला होता. पण काय बोलणं झालं हे सांगू शकत नाही. तर आता छातीवर तलवार ठेवली तरी मंत्री होणार नाही. झालंच तर आम्ही राजकुमारला मंत्री करू, असेही कडू यांनी म्हटलं आहे.