‘एवढा मोठा स्फोट झाला तरी त्यांचं थंड झालंच नाही’, राऊत यांच्या त्या दाव्यावर कडू यांची खोचक प्रतिक्रिया
शिंदे गटात लवकरच मोठा स्फोट होणार असल्याचं म्हणत शिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यावरून आता शिंदे गटातील नेत्यांनी ठाकरे गटावर टीका करण्यास सुरूवात केली आहे.
अमरावती : ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटा बद्दल मोठं वक्तव्य करताना गौप्यस्फोट केला. त्यांनी शिंदे गटात लवकरच मोठा स्फोट होणार असल्याचं म्हणत शिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यावरून आता शिंदे गटातील नेत्यांनी ठाकरे गटावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. याचदरम्यान दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपदी निवड झालेले आणि मंत्रीपदाची दर्जा मिळालेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी राऊत यांच्या त्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एवढा मोठा स्फोट झाला तरी त्यांचं थंड झालंच नाही का? आता राऊत यांच्या शिवसेनेकडे काहीच राहिलं नाही. फक्त 15 आमदार शिवसेनेकडे राहिलेत. 40 आमदार इकडे आले आहेत. त्यामुळं कसा स्फोट होणार? स्फोट होणार आहे की उरलेले 15 आमदार इकडे येणार हे वेळेच सांगेल असा टोला लगावला आहे.