‘लोक सरकारी खर्चाने येणार नाहीत’; राष्ट्रवादी नेत्याची ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावरून शिंदे-फडणवीस यांना टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ५ सप्टेंबरला जळगाव जिल्हा दौरा आहे. ते जळगाव शहरातील सागर पार्कवर सभा घेणार आहेत. त्यामुळे जळगावातून ते बंडखोरांना कोणता संदेश देतील याकडे जळगावकरांसह राज्याचे लक्ष लागले आहे.
जळगाव : 24 ऑगस्ट 2023 | पक्षांतर्गत बंडाळीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांची जळगावमध्ये 5 सप्टेंबर रोजी सभा होणार आहे. ते जळगाव शहरातील सागर पार्कवर सभा घेणार आहेत. सध्या या सभेची जोरदार तयारी सुरू असून आमदार एकनाथ खडसे यांनी याच्या तयारीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी खडसे यांनी, सभेच्या तयारीसाठी बैठक घेण्यात आली. तर शरद पवार यांचा दौरा हा जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे. त्यांच्या सभेला अधिकाअधिक लोक यावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत. पण आम्ही सरकारी पक्षात नसल्यामुळे शासन आपल्या दारी सारख्या कार्यक्रमांप्रमाणे एसटी गाडी लावता येणार नाही. स्वत: च्या खर्चाने हे आम्हाला करावं लागतं. त्यामुळे शासन आपल्या दारी सारख्या कार्यक्रमांना एसट्या लावतात, गाड्या लावतात तरी १५ हजाराच्या वर लोक येत नाहीत. शासकीय अधिकाऱ्यांना भत्ता देऊन हजर राहण्याच्या सुचना दिल्या जातात. ते प्रवास भत्ता घेऊन येतात तरीदेखील संख्या भरत नाही. तर आम्हाला बिना भत्ता, बिना पैसा लोकांना आणायचं आहे. मला विश्वास आहे की शासन आपल्या दारी सारख्या कार्यक्रमांपेक्षा येथे लोक निश्चितच जास्त येतील. सरकारी खर्चाने येणार नाहीत हे मात्र नक्की असा टोला त्यांनी लगावला आहे.