“राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून अहमदनगरमध्ये दंगली वाढल्या”, मनसेचा गंभीर आरोप
राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे हे अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री झाल्यापासून शहरासह जिल्हयात दंगलीचे प्रकार, खुनाच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये मनसे आता आक्रमक झाली असून त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अहमदनगर : राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री झाल्यापासून शहरासह जिल्हयात दंगलीचे प्रकार, खुनाच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये मनसे आता आक्रमक झाली असून त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “वर्षभरापासून जिल्हयात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राधाकृष्ण विखे पाटील हा प्रश्न हाताळताना अपयशी ठरले आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वकारून राजीनामा दिला पाहिजे अन्यथा मनसेच्या वतीने येत्या काळात त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येईल. राधाकृष्ण विखे हे पालकमंत्री झाल्यानंतर नगर शहरात दोन वेळा दगडफेक झाली, शेवगावमध्ये दंगल झाली, संगमनेरमध्ये दंगल झाली. शहरासह जिल्ह्यात हत्येच्या जवळपास दहा घटना घडल्या, असं असताना पालकमंत्री यांनी पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देणं गरजेचं होतं मात्र तसं होताना दिसत नाही.पालकमंत्री केवळ राजकारण करण्यात आणि स्वतः च्याच पक्षात गटबाजी करण्यात व्यस्त आहेत. शहरात आणि जिल्ह्यात वाढता जातीये तेढ यामुळे नागरिकांना असुरक्षित वाटत असून पालकमंत्री विखेंनी राजीनामा द्यावा,” असं मनसेचे नितीन भुतारे म्हणाले.