अंधारे प्रकरणात शिवसेना नेत्याला क्लीनचीट, राऊत यांचा फडणवीस यांच्यावर पलटवार; ‘कसलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष?’
संजय शिरसाट यांचे वादग्रस्त विधान करताना अंधारे हजर नव्हते, त्यामुळे गुन्हा घडत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. संजय शिरसाट यांचे वादग्रस्त विधान करताना अंधारे हजर नव्हते, त्यामुळे गुन्हा घडत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, अंधारे यांचा अवमान केल्याप्रकरणी संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. सरकार त्यांचं आहे. गृहखातं त्यांचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा अंधारे प्रकरणावर बोललं पाहिजे. जंतरमंतरवर प्रत्यक्ष मुली समोर येत आंदोलन करत आहेत. तरीही त्यांची तक्रार दाखल केली जात नाही. कसलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष? कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे. कायद्यावर कोणी तरी मालकी हक्क सांगत आहे. आम्ही लिहू तोच एफआयआर. आम्ही लिहू तोच गुन्हा अशा पद्धतीचं कारभार राज्यात सुरू आहे. पण हे औटघटकेचं आहे. सुषमा अंधारे या वरिष्ठ नेत्या आहेत. सुशिक्षित महिला आहेत. त्यांच्यावर केलेली विधानं ही अत्यंत गंभीर आहेत. मात्र ती कायद्याला गंभीर वाटतं नाहीत. त्यामुळे सगळंच गंभार आहे असं म्हणावं लागेल असेही राऊत यांनी म्हटलं आहे.