Nashik Food Poisoning : नाशिक हादरलं, महाप्रसादातून एकाच वेळी 50 ते 60 जणांना विषबाधा
ठाणगाव बाऱ्हे येथे हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन समस्त गावकरी यांच्या तर्फे करण्यात आले होते
नाशिक : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे येथे हनुमान जयंती निमित्ताने केलेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी 50 ते 60 जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. तर बाऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात या सर्वांवर उपचार सुरू आहेत.
ठाणगाव बाऱ्हे येथे हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन समस्त गावकरी यांच्या तर्फे करण्यात आले होते. सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान काल्याचे किर्तन होते. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचे विषबाधा झाल्याचे समजते. महाप्रसाद खाल्यानंतर अनेकांना त्रास होऊ लागल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. तर वैद्यकीय अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस निरीक्षक वाघ हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून महाप्रसादाचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कळत आहे.