जनतेच्या न्यायालयात नवनीत राणांची हार होणार, बच्चू कडू यांचा दावा

| Updated on: Mar 31, 2024 | 10:29 PM

अमरावती लोकसभा मतदार संघातून कमळ चिन्हावर भाजपाने नवनीत राणा यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू संतापले आहेत. बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांना अमरावती येथून उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

अमरावतीमध्ये भाजपाने नवनीत राणा यांना तिकीट दिल्याने त्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ठाकरे गटाचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते दिनेश बूब यांना अमरावती लोकसभेसाठी उभे केले आहे. आता अमरावती लोकसभा निवडणूकीत रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी देखील येत्या 2 तारखेला अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. त्यातच आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा पक्षाच्या न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात जिंकल्या तरी जनतेच्या न्यायालयात त्या हारच असल्याचे म्हटले आहे. अमरावतीच्या जनतेच्या मनात दिनेश बूब यांचेच नाव आहे. त्यांच्या प्रचारासाठी आम्ही काढणारी रॅली अमरावतीचे सर्व चित्रच पालटणारी असेल असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तानाशाही जनतेला आवडत नाही त्यामुळे भाजपाने अशा प्रकारे उमेदवार देणेच चुकीचे होते असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 31, 2024 10:27 PM