…तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही, काय म्हणाले एकनाथ खडसे

| Updated on: Jan 27, 2024 | 7:41 PM

सगेसोयरे बाबत अध्यादेश जारी करून राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. याबद्दल आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. सरकारने घाईघाईत निर्णय घेऊन आजचे मरण उद्यावर ढकलले असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

जळगाव | 27 जानेवारी 2024 : एकीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या मागणीनूसार सरकारने सगेसोयरेबाबत अध्यादेश काढत कुणबी नोंदी असलेल्यांच्या नातेवाईकांना आरक्षणाचा दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे या निर्णयावर टीका होत आहे. मराठा आंदोलकांच्या प्रचंड दबावामुळे सरकार झुकले आणि आजचं मरण उद्यावर ढकलत हा सगेसोयऱ्याचा निर्णय घाईघाईत घेतला असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. यामुळे सध्या तरी आंदोलन संपविण्यात सरकारला यश आले असले तरी भविष्यात फसवणूक झाली तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही असे खडसे यांनी म्हटले आहे. सगेसोयरे म्हणजे रक्तातील नाती असा अर्थ अपेक्षित असतो. आई, वडील, भाऊ, बहीण, बाप असे असते. घरात सून आली, सगेसोयरे म्हणजे व्याही मंडळी इतर नातलग या निकषात बसत नाहीत. बसत असले तर आनंदच आहे. पण सरकार एकाप्रकारे मराठा समाजाची दिशाभूल करतंय की काय असे होता कामा नये. हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टीकला पाहीजे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल असल्याने त्याचा निर्णय दोन तीन आठवड्यात अपेक्षित आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला असता तर अधिक संयुक्तिक झाले असते.

Published on: Jan 27, 2024 07:40 PM
सगेसोयरे आरक्षण अध्यादेश कोर्टात टीकेल का ? काय म्हणाले वकील उज्ज्वल निकम
Budget 2024 | ब्रीफकेस ते पेपरलेस, पाहा देशाच्या अर्थसंकल्पाचा अनोखा प्रवास