मग हुकूमशाह कोण? शरद पवार की…? सुप्रिया सुळे यांचा छगन भुजबळ यांना थेट सवाल
2014 विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवार आणि भाजपने संगनमताने आघाडी आणि युती तोडली याबाबत मला माहिती नाही. याचा अर्थ शरद पवार सर्वच पक्ष चालवत आहेत का? भुजबळांनी 2014 च्या निर्णयावर बोलण्यापेक्षा लोकांना नोकरी, शिधा मिळणार का यावर बोललं पाहिजे.
पुणे : 12 ऑक्टोबर 2023 | शरद पवार यांना अंधारात ठेवून पहाटेचा आणि 2 जूनचा शपथविधी झाला हे मंत्री छगन भुजबळ यांनी कबूल केलं. त्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतला हे कालच्या मुलाखतीमधून समोर आलं. शरद पवार यांना राजीनामा द्यायचा नव्हता. परंतु, भाजपसोबत जायचं असल्याचं लक्षात आल्यामुळे नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला. छगन भुजबळ यांनी कमिटी नको तुम्हीच अध्यक्ष रहा असा आग्रह केल्याचे म्हणाले. मग, हुकूमशाह शरद पवार की छगन भुजबळ हे लक्षात आलं पाहिजे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. मी अध्यक्ष झाल्यावर भाजपसोबत जाण्याचा निर्णय करणार होते, असं ते म्हणत आहेत. पण, ते अशक्य होतं. मी माझ्या वैचारिक भूमिकेशी ठाम होते. याआधी आम्ही सांगत होतो, त्यावर कुणी विश्वास ठेवत नव्हते. छगन भुजबळ यांच्या मुलाखतीमधून ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं, असेही त्या म्हणाल्या.