हसन मुश्रीफांना पुन्हा ईडीचा समन्स; हजर राहण्याचे निर्देश
अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना, ब्रिक्स इंडिया कंपनी आणि त्यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्यामागे अंमलबजावणी संचालनालयाचा ससेमीरा लागला आहे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. तसचे ईडीने मुश्रीफ यांना पुढील चौकशीसाठी 24 मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ते आता ईडीसमोर जातात का हे पहावं लागणार आहे.
अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना, ब्रिक्स इंडिया कंपनी आणि त्यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्यामागे अंमलबजावणी संचालनालयाचा ससेमीरा लागला आहे. याच्याआधी ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून तीन वेला छापा मारला होता. तर 20 मार्च रोजी ईडीने त्यांची सुमारे 10 तास चौकशी केली होती. ईडीने आतापर्यंत त्याची दोनदा चौकशी केली आहे.