राम मंदिराचं निमंत्रण मिळाले का ? काय म्हणाले शरद पवार
संसदेत घुसखोरी करणाऱ्यांबद्दल माहिती विचारणाऱ्या खासदारांना निलंबित करणे चुकीचे आहे. सत्ताधाऱ्यांकडे जनतेपुढे जाण्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम नाही. त्यामुळे राम मंदिराचा वापर करून सरकार वेगळे मत तयार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
अमरावती | 27 डिसेंबर 2023 : केंद्र सरकारने लोकांपुढे जाण्यासाठी ठोस स्वरुपाचा कोणताही कार्यक्रम नाही. म्हणूनच राम मंदिराच्या मुद्याचा वापर करुन जनतेमध्ये काही वेगळे मत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी शरद पवारांना राम मंदिराच्या उद्धाटनाचे निमंत्रण आले का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी राम मंदिराचे निर्माण होत आहे ही गोष्ट चांगली आहे. परंतू आपल्याला राम मंदिराच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले नसल्याचे त्यांनी सांगितले. 1977 साली पंतप्रधानांचा चेहरा जाहीर केला नव्हता. निवडणूका झाल्यानंतर मोरारजी देसाई यांना पंतप्रधान झाले असे त्यांनी सांगितले. सभागृहात घुसलेल्या तरुणांबद्दल माहीती विचारणाऱ्या 146 खासदारांना निलंबित करण्यात आल्याबद्दल शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी काय अशी चुकीची माहीती मागितली होती ? असा सवालही त्यांनी केला.