सामनाच्या अग्रलेखावरून राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा राऊत यांना टोला; म्हणाला, “कोदंडाचा टाणत्कार”
शरद पवारांनी भाकरी फिरवली नसून आता कोठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल”, असे सामनातून म्हटलं होतं
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि नेते प्रफुल्ल पटेल यांची निवड केली. यावरून सामनाच्या अग्रलेखात पवारांच्या या निर्णयावर भाष्य करण्यात आलं आहे. “शरद पवारांनी भाकरी फिरवली नसून आता कोठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल”, असे सामनातून म्हटलं होतं. त्यावरून आता चांगलचं राजकारण पहायला मिळत असून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात यावरून जुंपल्याचे पहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी नेत्यांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी आधी पुर्ण अग्रलेख वाचा त्यानंतर प्रतिक्रिया द्या. वाचा म्हणजे वाचाल असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राऊत यांना खोचक सवाल केला आहे. त्यांनी, आपण अग्रलेख लिहिता की उद्धव ठाकरे साहेब व आमच्यामध्ये आग लावण्याच काम करता? एकदा क्लिअर काय ते सांगाच म्हणजे आम्ही संभ्रमात राहणार नाही. अग्रलेख आम्हालाही लिहिता येतात. “कोदंडाचा टाणत्कार”आमच्याकडे पण आहे. तुम्ही आवरत नसाल तर नाईलाजाने लेखणी बाहेर काढावीच लागेल, असा इशारा दिला आहे.