गोपीचंद पडळकर यांना कुणी केलं आवाहन, म्हणाले ‘लबाडांच्या टोळीतून…’
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणाऱ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने आता गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केलय. चौंडी येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरु आहे. त्याची शासनाने दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्याने दिलाय.
सोलापूर : 20 सप्टेंबर 2023 | राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणाऱ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना भावनिक आवाहन केले आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी शेखर बंगाळे याने भंडारा उधळला होता. या कार्यकर्त्याने आमदार पडळकर यांच्याकडे एक मागणी केली आहे. सर्व समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. राज्य, केंद्र सरकारकडून नोकऱ्यांचे खाजगीकरण सुरू आहे. खाजगीकरणाला सर्व आरक्षण प्रेमींनी विरोध करावा. तर, राज्य शासनाने कंत्राटी भरती सुरू केली आहे. त्यामुळे आरक्षण मागणाऱ्या समाजाला आरक्षणाचा लाभ होणार का? असा सवाल शेखर बंगाळे याने केला आहे. आरक्षणाचे संरक्षण व्हावे त्याचे खाजगीकरण होऊ नये यासाठी मोठे आंदोलन करू. चौंडी आंदोलनाची शासनाने त्वरित दखल घ्यावी. अन्यथा धनगर समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लबाडांच्या टोळीतून बाहेर पडावे आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.