22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण, उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती

| Updated on: Jan 06, 2024 | 6:04 PM

अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राममंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत आहे. या सोहळ्याची तयारी मोठ्या जोशाने होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा होत असून त्याची तयारी जोरदार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. गोदातीरी सायंकाळी उद्धव ठाकरे आरतीही घेणार आहेत.

Follow us on

मुंबई | 6 जानेवारी 2024 : एकीकडे अयोध्येत येत्या 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातील महनीय व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्याचे आमंत्रण माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन गोदातीरी जाऊन महाआरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की 25 ते 30 वर्षांनी कोर्टाने राममंदिराच्या बाजूने निकाल दिला आहे. त्या राम मंदिराचे लोकार्पण येत्या 22 जानेवारीला होत आहे. आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्येच आणखी एक रामाचे मंदिर आहे. ज्या मंदिरात प्रवेशाकरीता डॉ. बाबासाहेब आंबडेकर, विनोबा भावे यांना संघर्ष करावा लागला होता. त्या काळाराम मंदिरात आम्ही जाऊ, प्रभू रामचंद्र पंचवटीला देखील काही काळ वास्तव्याला होते. त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या गोदातीरी सायंकाळी आम्ही आरती देखील घेणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येत कोण कोण जाणार ? कोणाला आमंत्रण आहे ? या राजकारणात मला पडायचं नाही कारण हा आनंदाचा अस्मितेचा क्षण असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.