कांद्याला भाव नाही? शेतकरी आक्रमक; प्रहार शेतकरी संघटनेचं आंदोलन; गळ्यात कांद्याच्या माळा, मुंडनही केलं
हवालदील झालेल्या शेतकऱ्यासाठी प्रहार शेतकरी संघटना आता रस्त्यावर उतरली आहे. प्रहार शेतकरी संघटना येवल्यात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून थेट प्रांत कार्यालयावर धडक देत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं.
नाशिक : गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याला बाजार भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आधी अवकाळी गारपीट आणि त्यानंतर भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यासाठी प्रहार शेतकरी संघटना आता रस्त्यावर उतरली आहे. प्रहार शेतकरी संघटना येवल्यात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून थेट प्रांत कार्यालयावर धडक देत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालत मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव, निर्यात होणाऱ्या कांद्याला अनुदान, लाल कांद्याप्रमाणेच उन्हाळ कांद्यालाही अनुदानाची मागणी करण्यात आली. तसेच खताच्या कमी करण्याची मागणी यासह विविध मागण्या करण्यात आल्या. तर सरकारचा यावेळी निषेध करत हे मुंडन आंदोलन करण्यात आले.