मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यासह सरकार बरखास्त करण्याची काँग्रेस नेत्याने का केली मागणी?
42 अंश सेल्सियस तापमानात आप्पासाहेबांचे अनुयायी बसले होते. त्यामुळे उष्माघात झाला आणि 12 लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरत ढिसाळ नियोजनामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे
मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यातील सत्ताधारी पक्षातले नेते, मंत्री आणि मान्यवरासह लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी 42 अंश सेल्सियस तापमानात आप्पासाहेबांचे अनुयायी बसले होते. त्यामुळे उष्माघात झाला आणि 12 लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरत ढिसाळ नियोजनामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाले असल्याची शंका व्यक्त करत एक व्हिडीओ ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. यावरूनच पटोले यांनी, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो, असे म्हटलं आहे.