पंकजा मुंडे यांचा शिंदे सरकारला टोला, कोणीतरी घोषणा करून…
महाराष्ट्रातील सत्तेतील नेते माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेत. त्यांची मुलं माझ्या वयापेक्षा 5-6 वर्षांनी लहान आहेत. राजकारणातील त्या व्यक्ती मोठ्या आहेत. मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री आश्वासक वाटावं असं ते काम करतील अशी अपेक्षा आहे.
सांगली : 7 सप्टेंबर 2023 | कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. संविधानिक मार्गाने आरक्षण द्यावे लागेल, अशा शब्दात माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. शिवशक्ती परिक्रमाच्या निमित्ताने सांगलीमध्ये पंकजा मुंडे यांचा मोठ्या जल्लोषात भाजपाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातल्या सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचे पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतलं. देवी देवतांचा मला आशिर्वाद आहे. लोकांचा देखील मला आशिर्वाद आहे म्हणून माझ्या चेहऱ्यावर तेज आहे असे त्या म्हणाल्या. आपल्याला कोणाच्या दारात जाण्याची वेळ येवू नये, लोकांना देखील अशी वेळ येवू नये यासाठी मी देवीला साकडे घातले आहे. मराठा आरक्षणाचे लोक मला यात्रेत भेटले. त्यांनी व्यथा मांडली. शेतकरी भेटले. त्यांच्याशी संवाद साधला, आदिवासी सोबत नृत्य करण्याचा योग आला. एकूणच महाराष्ट्राची संस्कृतीची चव घेतली असे त्यांनी सांगितले.