राहुल गांधी आणि अमित शाह यांची खडाजंगी, तर सोनिया गांधी म्हणाल्या ‘राजीव गांधी यांचे ‘ते’ स्वप्न पूर्ण होईल’
महिला आरक्षणाच्या बिलावरून लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी जातीय जनगणना करा. 2011 मधील आकडेवारी सार्वजनिक करा. नाही तर आम्ही ती सार्वजनिक करु असा इशारा दिला. तर महिला आरक्षणाच्या चर्चेत भाग घेताना सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल असे म्हटले.
नवी दिल्ली : 20 सप्टेंबर 2023 | महिलांना 33 टक्के आरक्षण देणारं विधेयक मोदी सरकारनं लोकसभेत मांडलं. या विधेयकाला कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी समर्थन दिले. पण, ओबीसींच्या मुद्द्यावर बोट ठेवत सरकारला घेरलं. महिलांना आरक्षण देताना जातीय जनगणना आवश्यक आहे हे राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितलं. केंद्रामध्ये 90 सर्वोच्च अधिकारी म्हणजेच केंद्रीय सचिव आहेत. मात्र त्यातील अवघे 3 सचिव ओबीसी आहेत याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले. राहुल गांधी बोलत असताना भाजप खासदारांनी गोंधळ घातला. त्यावर त्यांनी ‘डरो मत’ म्हणत शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या विधेयकावरून गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं. तर, याच विधेयकावर बोलताना सोनिया गांधी यांनी ‘हे विधेयक सर्वात आधी राजीव गांधी यांनी आणलं. हे विधेयक पास झाल्यावर राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल असेही त्या म्हणाल्या.