Rajesh Tope : ‘लहान मुलांच्या लसीकरणावर भर देणार’; आरोग्यमंत्र्यांची माहिती
12 ते 15 वयोगट आणि 15 ते 17 वयोगटातही लसीकरण कमी झालं आहे, ते वाढवण्यावर भर देणार आहोत. तसेच प्रीकॉशन डोसमध्येही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाईल, अशा सूचनाही राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.
मुंबई : आज पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांनी देशातील कोरानाच्या सद्य स्थितीवर सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) ही सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनासंदर्भात (Corona Update) पुन्हा काही सूचना करण्यात आल्या. तसेच त्यांनी राज्याला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच मास्क आणि तर परिस्थितीवरही सविस्तर भाष्य केले आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढल्यास चाचण्या वाढवल्या जाणार आहेत. तसेच सध्या राज्यात कोरोनास्थिती गंभीर नाही, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. तर टेस्टिंग करु, जिनोमिक सिक्वेन्सिंग करु, ट्रॅक टेस्ट करु, व्हॅक्सिनेशन वाढवू, आपल्या देशात ओमिक्रॉनचेच व्हेरिएंट आहेत, त्यामुळे अजून तरी चिंतेचं कारण नाही, असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले आहेत. त्यामुळे तुर्तास जरी काळजी करण्याचे कारण नसले तरी राज्य शासन आणि केंद्र सरकार संभाव्य धोका लक्षात घेऊन पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे.