राज्यात एकापाठोपाठ एक घटना? काय खिचडी शिजतेय स्नेह भोजनात?
या सर्व घडामोडी राज्यात होणाऱ्या सत्तांतराशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच राज्यात दोन स्नेह भोजनांचीही खमंग चर्चा सुरू आहे. त्यामुळे या भोजनामागे कोणती खिचडी शिजतेय असा सवाल सामान्यांना पडत आहे.
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल येण्याची शक्यता असतानाच राज्यात भूकंप होणार असा कायदातज्ज्ञांचा दावा. शरद पवारांचा राजीनामा, त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री राज्यात येणे, मुख्यमंत्र्यांची राज्यपालांशी भेट आणि फडणवीस यांचा मी पुन्हा येईनचा नारा यांमुळे राज्यात सध्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत. तर या सर्व घडामोडी राज्यात होणाऱ्या सत्तांतराशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच राज्यात दोन स्नेह भोजनांचीही खमंग चर्चा सुरू आहे. त्यामुळे या भोजनामागे कोणती खिचडी शिजतेय असा सवाल सामान्यांना पडत आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी मुंबईत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यांच्यापाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनावर दाखल झाले होत राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्याचबरोबर या उभयंत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाल्याने तसेच स्नेहभोजनही उरकल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर या भेटी सत्ता संघर्षाला घेऊन पडद्यामागच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.