डहाणूच्या गावपाड्यांवर लालपरी रूसली, 20 ते 22 वर्षांपासून बसच नाही; मग कशी मिळणार महिलांना 50% सवलत
डहाणू शहराच्या पूर्वेस असलेल्या 30 पेक्षा जास्त गावपाड्यांवर मागील 20 ते 22 वर्षांपासून बस सेवा बंद असल्याने येथील महिला ह्या राज्य सरकारच्या एस टी प्रवास सवलतीपासून वंचित आहेत.
पालघर : ग्रामीण भागातील महिलांना प्रवासात फायदा व्हावा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत सुरू केली. मात्र याचा फायदा डहाणूतील अनेक गावांना होताना दिसत नाहीये. डहाणू शहराच्या पूर्वेस असलेल्या 30 पेक्षा जास्त गावपाड्यांवर मागील 20 ते 22 वर्षांपासून बस सेवा बंद असल्याने येथील महिला ह्या राज्य सरकारच्या एस टी प्रवास सवलतीपासून वंचित आहेत. डहाणू शहराच्या पूर्वेस असलेल्या सारणी, उर्से, आंबिस्ते, दाभोन, मुरबाड, चिंचले, धानीवरी या ग्रामपंचायतीं सह परिसरातील 30 ते 35 गावपाड्यांवर मागील 20 ते 22 वर्षांपासून बस सेवा पूर्णपणे बंद आहे. रस्त्यांची असलेली दुरावस्था आणि प्रवाशांची कमतरता यामुळे येथील बस सेवा बंद झाल्याचं परिवहन महामंडळाकडून सांगण्यात येत असलं तरी सध्या या भागातील लोकसंख्या 20 ते 22 वर्षात तीन ते चार पटीने वाढली आहे. त्यामुळे येथील महिलांना खाजगी वाहनांचा प्रवासासाठी आसरा घ्यावा लागतोय. या सगळ्यामुळे येथील महिलांना शासनाने जाहीर केलेली बस प्रवासाची सवलत मिळत नसून या भागात खाजगी रिक्षा चालकांकडून आकारण्यात आलेल्या अव्वाच्या सव्वा भाड्यामुळे येथील महिलाही त्रस्त आहेत. पालघर सारख्या ग्रामीण भागात आजही लाल परी ग्रामीण भागाच्या प्रवासाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. मात्र डहाणू तालुक्यातील जवळपास 50% गावांमध्ये ही महाराष्ट्र शासनाची बस सेवा मागील 20 ते 22 वर्षापासून बंद आहे. त्यामुळे येथील महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते.