शिंदे-भाजप सरकार आणण्यात अजित पवार यांची मोठी मदत, गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेनेला (ठाकरे गट) त्यांचेच आमदार, खासदार पक्ष सोडून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. पुढील काळात ठाकरेंना आणखी झटके बसणार असून त्यांच्याकडे केवळ सकाळचा भोंगा शिल्लक राहील, अशी खिल्ली त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता उडवली.
नाशिक : महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे अर्थखाते अजित पवार यांच्याकडे होते. त्यावेळी त्यांच्याकडून निधी वाटपात दुजाभाव होत होता असं त्यावेळी शिवसेना आमदारांनी नाराजी बोलून दाखवली होती. तर त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना निधीच दिला नाही असेही बोलले जात होते. यावरून आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. याचमुद्द्यावरून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार हे महाविकास आघाडीचे सरकार पडण्याला जबाबदार असल्याचे तर ते सरकार पडण्यात त्यांची मोलाची साथ असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी निधी न दिल्यानेच शिवसेनेत उठाव झाला. तर त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली नाही. यातून उठाव झाला आणि महाविकास आघाडीचे सरकार पडले असेही महाजन यांनी म्हटलं आहे. तर शिवसेनेला (ठाकरे गट) त्यांचेच आमदार, खासदार पक्ष सोडून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. पुढील काळात ठाकरेंना आणखी झटके बसणार असून त्यांच्याकडे केवळ सकाळचा भोंगा शिल्लक राहील, अशी खिल्ली त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता उडवली.