मोदीजी आपण मोठमोठ्या सभा गाजवता, मग राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरं का देता आली नाहीत; सामनातून शाब्दिक हल्ला
आजच्या सामनाच्या अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मोदींच्या सभांचाही उल्लेख करण्यात आला आहे. पाहा...
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मोदी हे हजरजबाबी आहेत. मोठमोठय़ा सभा, आंतरराष्ट्रीय मंच ते गाजवून सोडतात. मग स्वतःच्या लोकसभेत अत्यंत किरकोळ वाटणाऱ्या राहुल गांधींच्या प्रश्नांना ते उत्तर का देऊ शकले नाहीत? आणि आता प्रश्नकर्त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यालाच हुकूमशाही म्हणतात. हा डरपोकपणासुद्धा आहेच. आपण एकटे विरोधकांना भारी पडलो आहोत असे पंतप्रधान गरजले, पण प्रत्यक्षात एकटे राहुल गांधी 7 फेब्रुवारी रोजी मोदी व त्यांच्या सरकारला भारी पडले हे आता स्पष्ट झाले. राहुल गांधी यांनी मैदान मारले व भाजपने रडीचा डाव खेळत राहुल गांधींना नोटीस बजावली. याला पलायनवाद म्हणतात. पाकिस्तानसमोर डरकाळ्या फोडायच्या व लडाखमध्ये घुसलेल्या चीनचे नावही घ्यायचे नाही, त्यातलाच हा प्रकार!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.