Sanjay Mandlik : शिंदे गटात सामील व्हायचं की नाही, दोन दिवसांत निर्णय घेणार, संजय मंडलिकांचं स्पष्टीकरण
मी दोन दिवसाचा अवधी घेतला आहे. कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मानतो. माझी विनंती आहे शिंदे साहेब आणि ठाकरे साहेब यांनी एकत्र यावे, असे संजय मंडलिक म्हणाले.
कोल्हापूर : कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याचे चर्चा सुरू झालीय. या पार्श्वभूमीवर आज मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक हमीदवाडा इथल्या सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या कार्यस्थळावर पार पडली. दोन वर्ष कोरोनामुळे खासदारांना म्हणावा तसा निधी मिळालेला नाही. यापुढील काळात जास्तीत जास्त निधी (Fund) मिळावा यासाठी शिंदे गटात सामील व्हावं, असा मतप्रवाह काही कार्यकर्त्यांनी मांडला तर काही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन मंडलिक यांनी निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. बहुतांशी कार्यकर्त्यांमध्ये शिंदे गटात सामील होण्याबाबतचा मतप्रवाह दिसून आला. दरम्यान, मी दोन दिवसाचा अवधी घेतला आहे. कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मानतो. माझी विनंती आहे शिंदे साहेब आणि ठाकरे साहेब यांनी एकत्र यावे. मी दोन दिवसात विचारपूर्वक निर्णय घेणार. शिंदे गटाचा दबाव असण्याचे कारण नाही. त्यांनी विनंती केली तर त्याचा जरूर विचार करेन, असे संजय मंडलिक म्हणाले आहेत.