“भाजप अजगर, वेगळं होण्याचा निर्णय योग्य”, गजानन कीर्तीकर यांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊत यांची टीका
भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे. आमची कामे केली जात नाही, अशी नाराजी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबई : भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जात आहे. आमची कामे केली जात नाही, अशी नाराजी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “गजानन कीर्तीकर हे आमचे फार जवळचे सहकारी होते. त्यांनी अशा प्रकारे सोडून जाणं हे आमच्यासाठी वेदनादायक होतं”, असं राऊत म्हणाले. “आज गजाभाऊ बोलतायत, की त्यांच्या गटाबरोबर सापत्न वागणूक केली जात आहे. त्यांना अपमानित केले जात आहे. मग आम्ही काय वेगळे सांगत होतो? भाजप बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी सावत्रपणाची वागणूक करते. भाजपने महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवण्याचा डाव आखला होता. त्यानुसार भाजपचे प्रयत्न सुरू होते. भाजप एक अजगर किंवा मगर आहे. आत्तापर्यंत जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकले. त्यामुळे आम्ही सावध झालो. आम्ही भाजपची साथ सोडली. ती भाजपविरोधात असलेल्या आमच्या मनातील चिड होती. आता शिंदे गटाला अनुभव येत आहे. त्यांना हळूहळू कळेल की उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती”, असे संजय राऊतांनी सांगितले.