‘आमच्या कंस मामाला ज्यांची भीती वाटते त्यांना…,’ संजय राऊत यांची कोणावर टीका
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. आम आदमी पक्षाची इंडिया आघाडी एकत्र निवडणूका लढणार होती. त्यामुळे लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आम पक्षाला कमजोर करण्यासाठी भाजपाने हे षडयंत्र रचल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर दिल्ली मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी रात्री अटक केली आहे. त्यानंतर विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. आपल्या विरोधकांना नष्ट करून देश आता चीन आणि रशियाच्या पुतीन यांच्या मार्गाने चालला असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केजरीवाल यांना तुरुंगात पाठवून त्यांचे सरकार पाडू इच्छित आहे. केजरीवाल जर राजीनामा देत नसतील तर भाजपाने त्याची चिंता करु नये. केजरीवाल यांना लोकांनी निवडले आहे. ईडीने, सीबीआयने निवडलेले नाही. लोकांनी ठरवावे त्यांनी मुख्यमंत्री रहावे की नाही. मला तर वाटते त्यांनी मुख्यमंत्री पदावर राहावे असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. कंसाला ज्याच्या ज्याच्यापासून भीती वाटत होती त्यांना त्याने तुरुंगात टाकले. शेवटी कंसाचा बळी घेणारा तुरुंगातच जन्माला आला असे राऊत म्हणाले. दारु घोटाळ्यातील आरोपी अरबिंदो फार्मा याने सर्वाधिक निधी भाजपाला दिला आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या ऐवजी भाजपा अध्यक्ष नड्डा यांनाच खरी अटक व्हायला पाहीजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.