“शिंदे गटातले 17 ते 18 आमदार संपर्कात, आजच सकाळी…”, संजय राऊत यांचा मोठा दावा
अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटातील आमदार भीडले, एकनाथ शिंदे यांचा राजीनामा आणि आमदारांचा उद्धव ठाकरेंशी संपर्क यासर्व चर्चांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई : अजित पवारांच्या बंडखोरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. परंतु अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाची कोंडी झाल्याची चर्चा आहे. मुळात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळूनच आपण शिवसेनेत उठाव केल्याचं सातत्याने शिंदे गटाकडून सांगितलं जात होतं. आता तेच सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गट अडचणीत आली आहे. दरम्यान अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटातील आमदार भीडले, एकनाथ शिंदे यांचा राजीनामा आणि आमदारांचा उद्धव ठाकरेंशी संपर्क यासर्व चर्चांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “शिंदे गटातले 17 ते 18 आमदार आमच्या संपर्कात आहेत. हे खोटं असेल तर पुन्हा शिवसेनेचं नाव घेणार नाही. तिकडचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते त्यांच्या व्यथा आणि वेदना आमच्यासमोर मांडत असतात. आम्ही त्या ऐकतो, परंतु त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही. आजही त्यांच्यापैकी चार जण माझ्याशी बोलले,” असं राऊत म्हणाले.