“अजित पवार भावी मुख्यमंत्री”, संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले, “शिंदे गटाने सत्य स्वीकारावं…”
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'जनतेच्या मनातले मुख्यमंत्री', उल्लेख असलेले बॅनर वर्षा बंगल्याबाहेर झळकल्याचे दिसले. त्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली, 21 जुलै 2023 | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले आहेत. अशातच अजित पवार यांचा जनतेच्या मनातले मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर वर्षा बंगल्याबाहेर झळकल्याचे दिसले. त्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, “अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील. भावी म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. मी याआधीही सांगितलं की, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल. अजित पवार यांच्या वाढदिवसाला असे काही बॅनर्स लागलेत की नाही, ते मला माहित नाही, मी काही ते पाहिलं नाही. परंतु ते लवकरच मुख्यमंत्री होतील हे सत्य आहे आणि हे सत्य आता शिंदे गटाने स्वीकारलं पाहिजे.”