‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी गत आदित्य ठाकरे यांची’, शिवसेना नेत्याचा पलटवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर यावर तोडगा निघाला असून संप मिटल्याची माहिती मिळत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले होते.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 । मुंबईमध्ये बेस्ट बस कंत्राटी कर्मचारी गेल्या 7 दिवसांपासून काम बंद संपावर आहेत. त्याचा थेट परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झाला आहे. तर त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर यावर तोडगा निघाला असून संप मिटल्याची माहिती मिळत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले होते. त्यांनी, काल मी पत्रकार परिषदेत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, त्यांच्या मागण्या आणि मुंबईकरांना होणारा त्रास हा मुद्दा मांडल्यावर इतके दिवस आत्मस्तुतीत मग्न असलेले मुख्यमंत्री अचानक जागे झाले आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भेटायला गेले. हरकत नाही, ह्यामुळे का होईना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाग येऊन बेस्टचा संप मिटणार असेल आणि मुंबईकरांच्या अडचणी कमी होणार असतील तर चांगलंच आहे! असे म्हटलं होते. त्यावरून आता राजकारण गरम होतं आहे. यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर आदित्य ठाकरे असे ट्विट करण्याचे काम करत असतात. ते त्यांचे काम आहे. पण कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी गत त्यांची झाल्याची टोला त्यांनी लगावला आहे.