Special Report | कंत्राटी मुख्यमंत्र्यावरुन ठाकरे – शिंदे भिडले
बंडखोरीनंतरचे काही दिवस शिंदे आणि ठाकरे या दोघांकडूनही एकमेकांवर बोलताना मर्यादा पाळल्या जायच्या. पण ही मर्यादारेषा आता दोन्ही बाजूंकडून ओलांडली गेलीय.
मुंबई : बेस्टच्या 50 व्या वर्धापन दिन सोहळ्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंवरच निशाणा साधला आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे कंत्राटी पद्धतीनं नेमल्यासारखे असल्याचा टोला लगावला. भाजपकडे जास्त संख्याबळ असूनही 50 आमदारांचा पाठिंबा असलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. याच्याकडेच उद्धव ठाकरेंचा रोख होता. उद्धव ठाकरेंनी अशी टीका केल्यावर शिंदे गटानंही प्रत्युत्तर दिलंच. बेस्टच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी शेराला सव्वाशेर मिळतोच असं सांगत जॉर्ज फर्नांडिस आणि स. का. पाटलांचंही उदाहरण दिलं. बाळासाहेबांचं नाव घेण्यावरुनही उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला मारला. भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. बंडखोरीनंतरचे काही दिवस शिंदे आणि ठाकरे या दोघांकडूनही एकमेकांवर बोलताना मर्यादा पाळल्या जायच्या. पण ही मर्यादारेषा आता दोन्ही बाजूंकडून ओलांडली गेलीय. हे प्रकरण आता पर्सनल शेरेबाजीपर्यंत आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवरच्या मारामारीपर्यंत पोहोचलं. त्यामुळं येत्या काळात ठाकरे विरुद्ध शिंदे-भाजप हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.