शिंदे गटातील आमदारानं आपल्याच मंत्र्यांचा चिमटा काढला, म्हणाला, ‘गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार कॉपी करतात’
शिंदे गटात सध्या आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान शिंदे गटातील एका आमदारचं भाषण चांगलचं व्हायरल होत आहे. तर त्यात त्याने थेट आपल्याच गटाच्या मंत्र्यांसह भाजपच्या आमदारांचा चिमटा काढला आहे.
बुलढाणा : 17 ऑगस्ट 2023 | राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे नुकतेच पावसाळी अधिवेशन पार पडले. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी शिंदे गटासह आपल्या गटातील आमदारांवर निधीचा पाऊस केला. त्यानंतर अनेक आमदारांच्या मतदार संघात आता कामांचा सपाटा सुरू झाला आहे. शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे एक भाषण यावेळी चांगलेच व्हायरल होत असून त्यांनी आपल्याच गटातील मंत्र्यांसह भाजप आमदारांवर खोचक टीका केली आहे. तर चिमटा काढताना कुणी कॉपी करून पास होत नसतं असं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे. गायकवाड यांनी मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, अमरावतीचे आमदार, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, जळगाव जामोद, चिखली भाजपचे आमदार हे आपली कॉपी करतात असे म्हटलं आहे. तर त्यांनी केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी अनेक वेळा मंत्री आणि आमदार राहिलेले गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर हे बुलढाण्यात येतात. तर त्यांच्या विकास कामांची कॉपी करतात असे गायकवाड यांनी आपल्या भाषणात म्हटल आहे. तर कॉपी करून कोणी पास होत नसतं असा चिमटाही त्यांनी आपल्याच मंत्र्यांचा काढला आहे.