भडकावू वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या अटकेची शिंदे गटाच्या नेत्याची मागणी
राज्यात राजकीय पक्ष आणि संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. याचदरम्यान त्यांनी साईबाबांबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता साईभक्तांकडून विरोध केला जात आहे.
मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | काही दिवसांपुर्वी महात्मा गांधी, महात्मा फुले आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर वादग्रस्त टीपणी संभाजी भिडे यांनी केली होती. त्यावर राज्यात राजकीय पक्ष आणि संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. याचदरम्यान त्यांनी साईबाबांबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता साईभक्तांकडून विरोध केला जात आहे. त्यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे राहुल कनाल यांनी आता हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. तर भिडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी ते मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही बोलले जात आहे. राहुल कनाल यांनी काहीच दिवसांपुर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. तर ते आधी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.