Video : शिंदे गटाचे दोन उमेदवार बदलणार ? राजकारणात चर्चा, पाहा स्पेशल रिपोर्ट
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आठ लोकसभा जागांचे उमेदवार जाहीर केले असून त्यातील दोन जागांवरच स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे हे दोन जागांचे उमेदवार बदलणार का ? याची चर्चा सुरु आहे.
शिंदेच्या शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. तर हातकणंगले येथे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाही विरोध होत आहे. धैर्यशील माने यांच्या विरोधात भाजपा पुरस्कृत आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे हे उमेदवार बदलण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हिंगोलीतील हेंमत पाटील यांना बदलण्याची मागणी भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी नांदेडच्या विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत पाटील यांचा सामना ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी होणार आहे. हिंगोलीत शिंदे विरुद्ध ठाकरे सामना आहे. हिंगोलीत उमेदवार देण्याचा अधिकार शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे. निवडून येईल असा उमेदवार सुचविण्याचे काम आपण करु शकतो. महायुतीत हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांचाच उमेदवार असेल. प्रत्येकाने युतीचा धर्म पाळावा असे फडणवीस म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहे. तेथे राजू शेट्टी यांना ठाकरे पाठींबा देणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सामील होण्यास नकार दिला आहे. ज्या ठिकाणी उमेदवार कमजोर असेल तेथे उमेदवार बदलला जाऊ शकतो असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. एकनाथ शिंदे गटाने आठ लोकसभा जागांचे उमेदवार जाहीर केले असून त्यातील दोन जागांवरच विरोध होत आहे.